The Haunted House.

"तू आधी शांत हो.. इथे बस जरा. मी ग्लास भरतो.."

विक्रम सुमेधला म्हणाला. सुमेध त्याच्याकडे आला तेव्हाच अत्यंत घाबरलेला होता, त्याचं पुर्ण शरीर घामाने निथळत होतं. त्याला धड बोलताही येत नव्हतं. विक्रमने आधी त्याला आत घेतलं आणि शांत केलं.

तीन महिने झाले असतील सुमेधला इथे येऊन. बदली होऊन इथे आला तेव्हा इथे त्याला कोणी ओळखत नव्हतं. पण तो अजून एकटाच असल्यामुळे हॉटेलमध्ये राहण्यात त्याला काहीच अडचण नव्हती. तसा तो दोन महिने हॉटेल मध्ये राहिलासुद्धा. ऑफिस मध्ये त्याची ओळख विक्रमशी झाली. दोघांच्या आवडी निवडी जवळपास सारख्याच असल्यामुळे त्यांच्यात लवकरच मैत्री झाली. विक्रमनेच सुमेधला रहायला घर शोधण्यास मदत केली. त्याच्या ओळखीच्या ब्रोकर थ्रू सुमेधला एक चांगला मोठा बंगला अगदी स्वस्तात भाड्याने मिळाला होता.

इतका मोठा बंगला अगदी स्वस्तात मिळाल्यामुळे सुमेध एकदम खुश होता. आतलं फर्निचर वगैरे जुन्या काळातलं असलं तरी एकदम चांगल्या परिस्थितीत होतं. त्या ब्रोकरने किंवा ज्याने कुणी त्या बंगल्याच्या मेन्टेनन्सचं काम केलतं त्याने ते अगदी चोख केलं होतं. एकच गोष्ट सुमेधला खटकली, ती म्हणजे बंगल्याचा रंग. आतून बंगला अगदी टापटीप ठेवला असला तरी बंगल्याच्या भिंतींना रंग मात्र जुन्याच काळातला होता, जो आता अगदीच उतरला होता. कदाचित बंगल्याला पहिल्यांदा जो रंग दिला होता त्यावर रंगरंगोटीचं काम केलंच गेलं नव्हतं.
हा एक पाॅईंट सोडला तर सुमेधला तो बंगला अतिशय आवडलेला. शिवाय त्याला कुठे कायमचं तिथे रहायचं होतं..? त्यामुळे त्याने त्याबद्दल  पुन्हा विचारही केला नाही.

सुमेधला वाटंत होतं विक्रमच्या ओळखीमुळेच त्याला बंगला इतक्या स्वस्तात मिळालाय. त्यामुळे आॅफिसमध्ये दिलेल्या ट्रीट व्यतिरिक्त त्याने स्पेशली विक्रम आणि त्याच्या फॅमिलीला वेगळी ट्रीट दिली होती.

आणि इकडे तो ब्रोकर, कुणीच घेत नसलेला बंगला भाड्याने का होईना, कुणीतरी घेतला याच्या आनंदात होता. त्याच्याबदल्यात त्याने बंगल्याच्या मालकाकडून बक्कळ कमिशन उकळलेलं.

एकूण सगळेच आनंदात होते.. सुमेध आणि विक्रमला बंगल्याबद्दल काही माहित नसल्यामुळे. आणि ब्रोकरला माहित असूनही, मिळालेल्या पैशांमुळे.. पण त्यांचा तो आनंद दुस-या दिवशी हँगओव्हर उतरेपर्यंत तरी टिकेल कि नाही याबाबत शंकाच होती...

.......

सुमेधला हा बंगला जसा आहे तसाच खूप आवडलेला. आतमध्ये सगळं फर्निचर एकदम व्यवस्थित असल्यामुळे त्याला नवीन काही घ्यायची गरज नव्हती. शिवाय ते सगळं अगदी छान असं मांडलेलं होतं. ज्याने हे घर बनवलं त्याने हे अगदी मनापासून सजवलं होतं.

झोपण्यासाठी म्हणून त्याने वरची एक बेडरूम फिक्स केली. त्या रूममध्ये भिंतींवर आधीपासूनच कुणाचेतरी फोटो होते. एका कपल चे, ते तरुण असतानाचे, आणि म्हातारे झाल्यानंतरचेही. शिवाय एक फॅमिली फोटोसुद्धा होता. ज्यात ते म्हातारा म्हातारी, आणि त्यांचा मुलगा आणि मुलगी होती. सुमेधने ते सगळे फोटो काढून व्यवस्थित दुस-या खोलीत नेऊन ठेवले. आणि त्याजागी स्वतःचा आणि फॅमिलीचा फोटो लावला.

त्यानंतर तो किचनकडे वळाला. ब-यापैकी भांडी वगैरे तिथे होतीच. त्याला फक्त गॅस किंवा इलेक्ट्रिक शेगडीची गरज होती. आणि ताज्या सामानाची. त्याला हव्या असणा-या सामानाची त्याने यादी केली. नंतर पुन्हा घरभर फिरून त्यात आणखी दोनचार वस्तू अॅड केल्या. त्यानंतर त्याचं आवरून तो आॅफिसला निघून गेला. घराच्या दाराला त्याचं त्याचं नवीन कुलूप लाऊन..
त्याला काय माहित, कि कुलूप नसतं लावलं तरी त्याच्या बंगल्याकडे कुणी फिरकणार नव्हतं..

संध्याकाळी सगळं सामान वगैरे घेऊन तो घरी आला. ते सगळं आवरायला आपला खूप वेळ जाणार आहे हे माहित असल्यामुळेच त्याने जेवण पार्सलच आणलेलं. तास-दोन तासात त्याचं किचनमधलं सामान लाऊन झालं. एकट्या माणसाला असं किती सामान लागणार..? तरी ह्याला सारखं बाहेर रहावं लागत असल्यामुळे ह्याने गरजेपुरता का असेना पण स्वयंपाक शिकून घेतलेला. दुसरा कुणी असता तर मेस लाऊन मोकळा झाला असता.

बाकीचं सगळंही आवरून तो दिवाणखाण्यात येऊन जेवायला बसला. आणि पहिल्यांदा त्याला एकटेपणाची जाणीव झाली. इतका वेळ काम करताना त्या कामाच्या नादात त्याला हे नव्हतं जाणवलं. बाकी माणूस सगळ्या गोष्टी एकट्याने एंजाॅय करेल, पण जेवण..? जेवताना कोणीतरी सोबत हवंच. एकट्याने केलेलं जेवण काय जेवण असतंय.? पोटात पडलेला खड्डा कसाबसा बुजवायचा आणि शांत व्हायचं.. झालं.

दुसरीकडे कुठे त्याला इतकं एकटं नव्हतं जाणवलं, कारण हाॅटेलात वगैरे बाकीची माणसंही असतातच. आणि अगदी त्याच्या रूममध्ये जरी जेवला, तरी टीव्ही असतोच. इथे फक्त तो आणि भयाण शांतता. जेवताना चमच्याचा आवाज जरी झाला तरी तो सगळ्या रूममध्ये घुमत होता. शेवटी मग त्याने मोबाईलवरचे व्हिडीओ बघत जेवण केलं. आणि शक्य तितक्या लवकर, जमलं तर उद्याच, टीव्ही आणायचं ठरवलं. झोपतानाही तो हेडफोन घालूनच झोपला...

.......

बंगल्यात रहायला आल्यानंतर सुमेधने दुस-याच दिवशी टीव्ही आणायचं ठरवलं. मात्र आॅफिसच्या कामामुळे दुस-या दिवशी त्याला आठवडाभरासाठी बाहेर जावं लागलं. आल्यानंतर मात्र दुस-याच दिवशी आॅफिस सुटल्यानंतर तो टीव्ही घ्यायला गेला. एक चांगलासा एलसीडी घेतल्यानंतर त्याने होम डिलीवरीसाठी त्याचा पत्ता दिला. पत्ता वाचताच दुकानाच्या माणसाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. आणि आम्ही होम डिलीवरी देतच नाही असं सांगितलं.
"ओके. मग हा टीव्ही भिंतीवर बसवण्यासाठी माणूस कधी पाठवताय?", सुमेधने विचारलं.
त्यावर दुकानदाराने, आम्ही तशी सर्विस देत नसल्याचं सांगितलं. आणि दुकानात काम करणा-या पो-याला तो टीव्ही स्टँडवर फिक्स करायला सांगितला. सुमेधला वाटलं बंगला गावापासून लांब असल्यामुळे जास्त पैसे मिळावेत म्हणून दुकानदार नको म्हणतोय. त्यामुळे त्याने जास्त पैसे देऊ केले. मात्र दुकानदाराने, तसं काम करायला आपल्याकडे माणूसच नसल्याचं सांगितलं. मग सुमेधने नाईलाजाने विक्रमला बोलावून त्याच्या गाडीमधून टीव्ही घरी नेला. त्याआधी त्यांनी केबल कनेक्शन मिळण्याबद्दल चौकशी केली. केबलवाला दुस-या दिवशी सकाळी यायला तयार झाला, तेही जादा पैसे दिल्यावरच.

टीव्हीच्या निमित्ताने विक्रमलाही घर दाखवणं झालं. खरंतर सुमेधने रविवारी विक्रमला आणि त्याच्या फॅमिलीला घरी बोलवायचं ठरवलेलं. पण मधल्या आठवडाभराच्या कामामुळे त्याला वेळच मिळाला नाही. आणि आता विक्रमला आधीच यावं लागलं.. रात्री नऊ-साडेनऊला विक्रम त्याच्या घरी गेला. सुमेधही थोडावेळ मोबाईलवर टाईमपास करून झोपायला गेला. आज विक्रमशी गप्पा मारल्यामुळे असेल किंवा दुसरं काही कारण असेल, पण सुमेधला एकटं वाटत नव्हतं. त्यामुळे आज त्याला झोपताना हेडफोन्सची गरज नव्हती. त्यामुळे तो तसाच झोपला.

रात्री मध्येच धडाधड कायतरी पडल्याच्या आणि त्यापाठोपाठ खळ्ळकन् काच फुटल्याच्या आवाजाने तो दचकून जागा झाला. उठून लाईट लाऊन त्याने पाहिलं, तर त्याने अडकवलेले त्याचे व त्याच्या फॅमिलीचे सगळे फोटो फ्रेम्स भिंतीवरून खाली पडून फुटलेले. त्याला दोन मिनिटे काही सुचेनाच. त्याने उठून काळजीपूर्वक त्या फ्रेम्स उचलल्या. ज्या खिळ्यांना त्या फ्रेम्स अडकवलेल्या ते खिळे खूप जुने- गंजलेले होते. त्याला वाटलं कदाचित त्यामुळे ह्या फ्रेम्स पडल्या असतील.. पण एकाच वेळी सगळ्या..? ह्याचं कोडं काही त्याला सुटेना..

.......

त्या रात्री सुमेधला नंतर लवकर झोप नाही लागली. त्यामुळे सकाळी त्याला उठायला उशीर झाला. त्याचं आवरून होत नाही तोच केबलवाला आला. त्याच्यासोबत आणखी एकजण होता. आता हा आणि वेळ खाणार म्हणून मग त्याने आॅफिसमध्ये फोन करून उशीरा येत असल्याचं कळवलं. मात्र केबलवाल्याने आणि त्याच्या साथीदाराने अगदी घाईघाईतच काम उरकलं. केबलवाला तर घरातदेखील आला नाही. काम झाल्यावर पैसे घ्यायलासुद्धा त्याने त्याच्यासोबत आलेल्या माणसालाच पाठवलं. सुमेधला वाटलं जादा पैसे दिल्यामुळेच त्याने आपला जास्त वेळ नाही खाल्ला. ते झालं की लगेच केबलवाला निघून गेला, आणि सुमेधही आॅफिसला गेला.

आज संध्याकाळी घरी आल्यावर सुमेधला घर घरासारखं वाटलं. टीव्ही चालू करून मोठ्याने गाणी लाऊन तो फ्रेश व्हायला गेला. नंतर जरावेळ टीव्ही बघून, तो जेवणासाठी कायतरी बनवायला किचनमध्ये गेला. पुन्हा मोठ्याने गाणी लाऊन. अचानक टीव्हीचा आवाज यायचं बंद झालं. त्यामुळे काय झालं बघायला तो बाहेर आला. तर टीव्ही बंद झाला होता. टीव्ही असा आपोआप कसाकाय बंद झाला म्हणून त्याने बटणं आणि वायरिंग चेक केली, तर सगळं नीट होतं. मग त्याने पुन्हा टीव्ही चालू केला, तर तो पहिल्यासारखा चालू झाला. कायतरी झालं असेल म्हणून त्याने विषय सोडून दिला. आणि गाणी लाऊन तो पुन्हा किचनमध्ये गेला. पुन्हा दहा मिनिटांनी अचानक टीव्हीचा आवाज यायचं बंद झालं. वैतागून त्याने पुन्हा हाॅलमध्ये डोकावून पाहिलं; तर यावेळी टीव्ही चालू होता, मात्र स्क्रीन पूर्ण निळी दिसत होती. त्याने केबलची वायर चेक केली. वायर एकदम जशीच्या तशी होती. मग त्याने केबलवाल्याला काॅल केला, तर त्याने केबल गेल्याचं सांगितलं, आणि तासाभरात परत सुरू होईल असंही सांगितलं. वैतागून सुमेध परत आत गेला. तो पाणी पित होता तेवढ्यात मोठ्याने गाण्याचा आवाज सुरू झाला. दचकून त्याच्या हातातला ग्लास खाली पडला.
मगाशी त्याने टीव्ही चालूच ठेवलेला, त्यामुळे केबल सुरू झाली कि, लगेच गाणं सुरू झालं. स्वतःच्याच बावळटपणावर हसत त्याने ग्लास उचलला. आणि बाहेरच्या खोलीत जाऊन टीव्ही बघत त्याने जेवण केलं.. आणि नंतर थोडावेळ टीव्ही बघून तो झोपायला गेला.

त्यानंतरच्या रविवारी, भारताची क्रिकेट मॅच होती. सुमेधने विक्रमला आणि त्याच्या बायकोला घरी बोलावलं. त्याच्या घराची फाॅर्मल व्हिजिटही होईल, आणि एकत्र मॅचही एंजाॅय करता येईल असा त्यांचा प्लॅन होता. शिवाय लिमिटमध्ये ड्रिंक करायलाही विक्रमच्या बायकोने परवानगी दिल्यामुळे दोघे विशेष आनंदात होते.

ठरल्याप्रमाणे रविवारी संध्याकाळी विक्रम आणि त्याची बायको- मेघा, दोघं सुमेधच्या घरी गेले. गेल्यावर दोघांनी सगळं घर पाहिलं. किचनची अवस्था बघून सुमेधने मेघाची बोलणीदेखील खाल्ली. आणि त्यामुळे सुमेध तिघांसाठी काॅफी करणार होता ते कॅन्सल करून मेघानेच तिघांसाठी काॅफी करायचं असं ठरलं, आणि मग तिने त्या दोघांना बाहेर पाठवलं.

ते दोघं टीव्ही बघत बाहेर बसलेले. आणि मेघा किचनमध्ये होती. तेवढ्यात त्या दोघांना किचनमधून मेघाच्या किंचाळण्याचा आवाज आला. काय झालं म्हणून बघण्यासाठी ते किचनकडे पळाले तेवढ्यात मेघाच धावत किचनमधून बाहेर आली. विक्रमने तिला शांत करत, काय झालं म्हणून विचारलं. त्यावर किचनकडे बोट करत, "ते.. ते मांजर.." एवढंच म्हणाली ती. सुमेधने आत जाऊन पाहिलं, तर किचनच्या खिडकीच्या बाहेरच्या बाजूला एक काळंकुट्ट मांजर आतमध्ये बघत बसलेलं. त्याचे डोळे अगदी हिरवेगार असे होते. आणि बघताना ते अगदी डोळ्यात डोळे घालून पाहत बघत होतं. त्याच्या नजरेतला तो थंडपणा जास्त भीतीदायक होता. सुमेधने त्याला भीती घालून हाकललं, मात्र ते दचकून उठून पळून न जाता, शांतपणे उठलं. सुमेधवरची आपली नजर जराही ढळू न देता. आणि तितक्याच शांतपणे वळून निघून गेलं. त्याची ती नजर बघून सुमेधच्या अंगावर क्षणभर काटाच आला.
ते गेल्यावर सुमेध बाहेर आला. "मांजर होतं. हाकललं." एवढंच त्याने विक्रमला सांगितलं.
"मांजराला घाबरून ओरडलीस तू..?" असं म्हणून विक्रम जोरजोरात हसायला लागला. "हसू नकोस, केवढं भयानक होतं ते मांजर, मलाच माहीत." मेघा म्हणाली. मग थोड्या वेळात सगळे रिलॅक्स झाले. नंतर जेवताना बराच वेळ अधूनमधून विक्रम "म्यांssव" करून मेघाला चिडवत होता. जेवण त्यांनी येतानाच बाहेरून आणलेलं. त्यामुळे मेघाला फक्त प्लेट्स आणायला किचनमध्ये जावं लागलं. त्यानंतर सुमेध नको नको म्हणत असतानाही मेघाने प्लेट्स धुवून ठेवल्या. मॅच संपल्यावर जरावेळ बसून मग ते दोघे त्यांच्या घरी निघून गेले..
आणि 'घेतली' असल्यामुळे सुमेधही जास्त काही न करता वर जाऊन झोपला. उद्या परत आॅफिससाठी लवकर उठायचं होतं...

.......

त्या रात्री सुमेध अगदी गाढ झोपला होता. सकाळी उठल्यावर त्याचं डोकं जड झालेलं. उठल्या उठल्या तो तसाच डोळे चोळत बाथरूमकडे गेला. त्याने बाथरूमचा दरवाजा ढकलला, पण तो उघडलाच नाही. जणू आतून कुणीतरी कडी लावली असावी. त्याला वाटलं दरवाजा जाम झालाय, म्हणून त्याने दरवाजाला जोरात धक्का मारून पाहिला. पण परिणाम शून्य. इतक्यात आतून कसलातरी आवाज आला म्हणून तो थांबला. तो फ्लशचा आवाज होता. आतला आवाज नीट ऐकू यावा म्हणून सुमेधने दाराला कान लावला, तर त्याचं डोकं टेकल्यामुळे तो दरवाजा पुढे सरकला गेला. जणू पहिल्यापासून तो उघडाच होता. सुमेधला काहीच सुचेना. तो आतमध्ये गेला, तर आतही कुणीच नव्हतं. बरं तिथं अशी खिडकीही नव्हती कि ज्यातून कोणी आत येईल किंवा बाहेर जाईल. तशा कनफ्यूज्ड अवस्थेतही सुमेधने त्याचं आवरलं.

आवरून परत वर जाताना त्याचं लक्ष बाहेरच्या खोलीत गेलं, टीव्ही त्याच्या जागेवर नव्हता. काय झालं बघायला सुमेध पुढे सरकला तेव्हा त्याला दिसलं, टीव्ही खाली पडून फुटलेला. सुमेधने लगेच पुढे जाऊन तो उचलून बघितला. समोरची काच फुटलेली. त्याने आजूबाजूला पाहिलं. टीव्ही ज्या टेबलवर ठेवलेला त्याच्या टेबलक्लाॅथवर मांजराच्या पंजाचे ठसे होते. क्लिअरली मांजराच्या धक्क्याने टीव्ही पडला होता असं दिसत होतं. त्या मांजराच्या नावाने शिव्या देत सुमेध उठला आणि वर गेला.
वर गेला तेव्हा त्याला आणखी एक धक्का बसला. त्याचा बेड आवरलेला होता. त्याने स्वतः तरी बेड आवरल्याचं त्याला आठवत नव्हतं. पण बेड तर आवरलेला होता. आणि घरात तरी त्याच्याशिवाय कोणीच नव्हतं. चोर असू शकतो? पण तो बेड आवरून का ठेवेल मग? कि आपणच बेड आवरलेलं लक्षात नाही आपल्या..? अजूनही हँगओव्हर तर नाही ना राहिला..? पण इतकी कुठे पिलो होतो मी..? इतकं सगळं अॅट अ टाईम डोक्यात चालू असल्यामुळे सुमेधचं डोकं ठणकायला लागलं.
एरवी त्याने सरळ आॅफिसला सुट्टी टाकली असती, पण सध्या त्याला घरातच थांबू वाटत नव्हतं. आॅफिसमध्ये लक्ष तरी दुसरीकडे लागलं असतं, शिवाय विक्रमशी यावर बोलता येईल असा विचार करून तो पटापट आवरून आॅफिसला निघून गेला.
आॅफिसमध्ये त्याला समजलं कि विक्रम आला नाहीये, त्याने सिक लीव्ह टाकलीये. त्याला फोन करून विचारलं तर त्याचंही डोकं जाम दुखत असल्याचं त्यानं सांगितलं. अशा स्थितीत त्याला काही न सांगितलेलंच बरं, असं वाटून सुमेधने घरातल्या घटनांचा उल्लेख टाळला.
दिवसभर आॅफिसमध्येही त्याचं कामात लक्ष नव्हतं. राहून राहून त्याला ते मांजर आठवत होतं...

संध्याकाळी तो घरी गेला तेव्हा त्याला आणखी एक धक्का बसला. त्याच्या घराशेजारचा लाईटचा खांब तुटून पडलेला. तोच, ज्याच्यावरून त्याच्या घराला लाईट सप्लाय होत होती. आणि तेच काळं मांजर त्याच्या बाजूला बसलं होतं. आणि शांतपणे सुमेधकडे पाहत होतं. सुमेधने रागाने त्या मांजराच्या दिशेने एक दगड भिरकावला. मात्र तो त्याला लागला नाही. सुमेधला जास्त आश्चर्य या गोष्टीचं वाटलं, कि ते मांजर दगडामुळे जराही बिचकलं नाही. ते अजूनही शांतपणे सुमेधकडेच पाहत होतं. जरासं घाबरून सुमेधने त्याच्याकडे पहायचं टाळलं, आणि शक्य तितक्या वेगात तो घराजवळ गेला.

मांजराच्या भीतीने तो लवकरात लवकर घरात जायच्या प्रयत्नात होता. मात्र तो घराच्या पाय-या चढणार तेवढ्यात कसल्याशा आवाजामुळे तो तसाच थांबला. तो आवाज घराच्या आतून येत होता. कसलासा कार्यक्रम चालू होता. पण कशावर? टीव्ही तर फुटलेला. त्याने दरवाजाजवळ जाऊन नीट कान देऊन ऐकलं तेव्हा त्या कार्यक्रमाच्या आवाजासोबत येणा-या खरखर आवाजामुळे त्याला समजलं, हा रेडिओचा आवाज होता. पण त्याच्याकडे तर रेडिओ नव्हताच. मग? नक्कीच आपण आॅफिसमध्ये असताना कुणीतरी बंगल्यात आलंय. असा विचार करून सुमेध चोरपावलांनी बंगल्याच्या एका बाजूला गेला. तिथल्या खिडकीमधून बाहेरची खोली दिसत होती.
त्याने खिडकीमधून डोकावून पाहिलं, तर समोरच्या सोफ्यावर कुणीतरी बसलेलं. मात्र लाईट नसल्यामुळे सुमेधला केवळ तिथे एक सावली दिसत होती. आणि त्या सोफ्याच्या शेजारीच एक रेडिओ होता.

सुमेध रागारागाने समोरच्या दरवाजाकडे निघणार तेवढ्यात किचनमधून त्याला कसलासा आवाज आला. किचनमध्येही कुणीतरी आहे..? अरे नेमके किती जण आलेत ? माझं घर ताब्यात तर नाही ना घ्यायचं यांना..? असा विचार करत तो मागच्या बाजूला किचनच्या खिडकीजवळ आला. त्याच खिडकीत, ज्यात काल मांजर होतं. त्याने आत डोकावून पाहिलं. कुणीतरी कायतरी बनवत होतं. मात्र अंधारामुळे त्याला फक्त एक काळी सावली दिसत होती, जी किचनमध्ये इकडून तिकडे करतीये. इतक्या अंधारात कोण काय बनवतंय..? तेही न धडपडता..? इथे थांबून आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत. असा विचार करून तो पुढे आला. आणि त्याने समोरचा दरवाजा उघडला.
दरवाजा उघडल्या उघडल्या रेडिओचा आवाज बंद झाला. सुमेध पुढे होऊन त्या सोफ्यात बसलेल्या माणसाकडे गेला, पण तिथे सोफ्यात कुणीच नव्हतं. मग तो किचनकडे गेला. किचनमध्येही कुणीच नव्हतं. त्याला वाटलं आपल्या येण्याची चाहूल लागल्यामुळे दोघे वरती पळून गेलेत. वरती जाण्याआधी सुमेधने मेणबत्ती पेटवली. आणि तिथला चाकू हातात घेतला. काय सांगावं, त्यांनी अटॅक केला तर..?

आणि तो किचनमधून बाहेर आला तेवढ्यात त्याला सोफ्यावर कुणीतरी बसलेलं दिसलं. तो एका हातात मेणबत्ती आणि दुस-या हातात चाकू घेऊन सोफ्याजवळ गेला. त्याने त्या माणसाच्या चेह-याजवळ मेणबत्ती नेली. मेणबत्तीच्या प्रकाशात त्याला दिसलं, तो एक म्हातारा होता. आणि सध्या डोळे बंद करून शांत पडून होता. त्याला उठवायला म्हणून सुमेधने त्याला हलवलं, तर त्याची मान एका बाजूला कलंडली गेली. सुमेध ते पाहून जाम हादरला! तरीही त्याने चाकू हातात तसाच ठेऊन त्या हाताची दोन बोटं त्या म्हाता-याच्या गळ्याजवळ टेकवली. आणि नाडी नाहीये म्हणल्यावर घाबरून झटक्यात त्याने हात मागे घेतला. इतका फास्ट कि तो स्वतः मागे पडता पडता वाचला.
इतका मोठ्ठा बंगला, लाईट नाही, त्यामुळे सगळीकडे अंधार, आणि समोर एक प्रेत..!
हा कधी मेला असेल..? आपण आल्यानंतर कि आधीच..? आणि किचनमधली व्यक्ती..? ती वरतीच आहे कदाचित्. असा विचार करत सुमेध उठला, आणि वरती जाऊ लागला.  तो एकदम सावधपणे एक एक पायरी चढत वर चाललेला. तो शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचला, तोच पुन्हा रेडिओचा आवाज सुरू झाला. अचानक झालेल्या आवाजामुळे तो इतका घाबरला कि त्याला अटॅकच यायचा बाकी होता. त्या आवाजामुळे तो खाली बघू लागला, खाली काही हालचाल होत नाहीये असं वाटल्यावर तो वर जाण्यासाठी पुन्हा फिरला, तोच जिन्याच्या वरच्या टोकाला, त्याच्या अगदी समोर, तोच म्हातारा छद्मीपणे हसत उभा होता. त्याला पाहून दचकून मागे सरकल्यामुळे सुमेधचा तोल गेला, आणि तो जिन्यावरून गडगडत खाली आला.

तो खाली आला आणि कुणाच्यातरी पायाजवळ पडला. तशाही अवस्थेत तो घाबरून सरसर मागे सरकला. तो काही विचार करू शकणार इतक्यात लाईट सुरू झाल्या. प्रकाशात त्याला दिसलं कि, तो जिच्या पायाजवळ पडलेला ती एक जाडी म्हातारी होती. तिला पाहिल्यावर सुमेधला स्ट्राईक झालं. कि ते दोघे त्या बेडरूममधल्या फोटोमधले म्हातारा-म्हातारी होते. पण ती गोष्ट इतकी शाॅकिंग नव्हती. शाॅकिंग तर हे होतं, कि सुमेध तिच्या आरपार पाहू शकत होता.
म्हणजे ती.. म्हणजे ती भूत होती..?
आणि तो म्हातारा? आॅब्वियसली.. सुमेधने वरती पाहिलं, त्या म्हाता-याची मान अजूनही भयानकरीत्या वाकडीच होती, जणू ती मोडलेलीच.
हे सगळं पाहिल्यावर त्याला सकाळपासूनच्या घटनांचा अर्थ लक्षात येत होता. आणि सध्या तरी भीतीने त्याच्या अंगातलं त्राणच गेलतं. तितक्यात बाहेरचा दरवाजा उघडला गेला. आणि "म्यांsssव" करत ते काळं मांजर आत आलं..

दरवाजा उघडलेला पाहून अंगातलं उरलेलं सगळं बळ एकवटून तो दरवाजाकडे धावला. आणि बाहेर पडून तसाच धावत धावत विक्रमकडे गेला...

.......

"तू आधी शांत हो.. इथे बस जरा. मी ग्लास भरतो.."
विक्रम सुमेधला म्हणाला. सुमेध त्याच्याकडे आला तेव्हाच अत्यंत घाबरलेला होता, त्याचं पुर्ण शरीर घामाने निथळत होतं. त्याला धड बोलताही येत नव्हतं. विक्रमने आधी त्याला आत घेतलं आणि शांत केलं.

एक पेग घेतल्यावर सुमेधला जरा हुशारी आली. त्याने पहिल्या दिवशी झालेल्या त्या फोटोंच्या मॅटरपासून सगळं घडाघडा विक्रमला सांगून टाकलं. तो नाॅनस्टाॅप बोलत होता. कदाचित आपण थांबलो तर परत बोलता येईल कि नाही याची त्याला खात्री नव्हती. तो सलग सांगत होता. विक्रम आणि मेघा ऐकून घेत होते. मध्ये मांजराचा उल्लेख आल्यावर मेघाने एक-दोनदा बोलण्यासाठी तोंड उघडलेलं; मात्र विक्रमने तिला इशा-यानेच गप्प बसवलेलं.
विक्रमचा भुताखेतांवर विश्वास नव्हता, मात्र सुमेधची स्थिती पाहून त्याने त्याच्यावर विश्वास असल्याचं दाखवलं. मेघाला तर पूर्णपणे खात्री होती कि सुमेध खरं बोलतोय, कदाचित तिने ते मांजर पाहिलं असल्यामुळे असेल, पण तिला सुमेधने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर पूर्ण विश्वास बसला होता.
आता पहाट होत आलेली, विक्रमने मेघाला झोपायला पाठवलं. मग तो सुमेधला म्हणाला, आपण आधी ब्रोकरशी याबद्दल बोलू. आता तू जरावेळ रेस्ट घे, सकाळी आवरून आपण त्याच्याकडे जाऊया.

सकाळी ब्रोकरकडे गेल्यावर आधी त्याने आपल्याला काहीच माहिती नसल्याचं दाखवलं. त्याला वाटलं सुमेधला फक्त वेगवेगळे आवाज वगैरे आले असतील, त्यामुळे आपण अजाणतेपणाचं सोंग घेतलेलंच बरं. मात्र सुमेधने जेव्हा त्याला त्या म्हातारा म्हातारीबद्दल सांगितलं, तेव्हा तो ताडकन् जागेवर उभा राहिला. या आधीही त्याला ब-याचदा बंगल्याबद्दलच्या तक्रारी मिळाल्या होत्या. मात्र त्या दोघांना पाहिलेला सुमेध पहिलाच होता. तो ब्रोकर आतमध्ये गेला, आतमधून त्याने एक फोटो अल्बम बाहेर आणला. आणि त्यातला एक फोटो या दोघांना दाखवत त्याने विचारलं "हेच का ते जोडपं..?"

त्या अल्बममध्ये त्याच म्हातारा-म्हातारीचे फोटो होते. खूप सारे. अगदी तो बंगला बांधायला सुरु व्हायच्या आधी ती जमीन मोकळी होती तेव्हापासूनचे. सुमेधने नोटिस केलं, कि फोटोमधलं फर्निचर अगदी तसंच आहे जसं त्याने बंगला पाहताना होतं. फोटो पाहता पाहता विक्रम एका फोटोपाशी थांबला. त्याने सुमेधला त्या फोटोमधलं मांजर दाखवलं. जे त्या म्हातारीच्या मांडीवर शांतपणे झोपलेलं. ते 'तेच' मांजर होतं. विक्रम आणि सुमेधने एकमेकांकडे पाहिलं.

"सो.. तुला हे सगळं आधीपासून माहित होतं..?", विक्रमने ब्रोकरला विचारलं. त्यावर त्याने आधी ज्या लोकांकडून बंगल्याबद्दल तक्रारी आल्या होत्या, त्याबद्दल सांगितलं. मात्र आपला भुताखेतांवर विश्वास नसल्यामुळे, आणि बंगला भाड्याने द्यायचा असल्यामुळे आपण सुमेधला काही सांगितलं नाही, असं म्हणून तो मोकळा झाला.
सुमेधच्या लक्षात आलं कि ह्याला बोलून काही उपयोग नाही. त्याचं कामच असं होतं कि त्याला खोटं बोलणं भाग होतं. मग त्यांनी ब्रोकरकडून त्या घराच्या मालकाचा पत्ता घेतला. सुरुवातीला त्याने तो देण्यास टाळाटाळ केली, मात्र त्या़चं नाव मध्ये येणार नाही याची खात्री, आणि थोडे पैसे दिल्यानंतर त्याने गपचुप त्यांना मालकाचा पत्ता दिला. त्याने सांगितलं कि ते म्हातारं जोडपं होतं, तेच बंगल्याचे खरे मालक होते. आता त्याचा ताबा त्यांच्या मुलाकडे असतो, जो अमेरिकेत राहत होता. ब्रोकरकडून मिळालेला पत्ताही अमेरिकेचाच होता. तिकडे जाणं तर शक्य नव्हतं. मग त्यांनी त्याला फोन केला. मात्र "बंगल्यासंबंधी जे काही असेल ते ब्रोकरला विचारा" असं म्हणून त्याने फोन कट केला. आणि ब्रोकरने तर आपल्याला जेवढं माहित होतं तेवढं आपण सांगितल्याचं सांगून हात वर केले.

विक्रमला इथेच डेड एन्ड दिसू लागला. मालकापर्यंत जाऊ शकत नाही, त्याला इथे बोलावू शकत नाही, ब्रोकर म्हणतो त्याला काही माहित नाही, झालेल्या घटनांचा पुरावा नसल्यामुळे पोलिसांकडे जाता येत नाही. पुढे जायला मार्गच नव्हता. मध्ये सुमेधला वाटलेलं कि त्या घरात दिवसा कॅमेरे लाऊन रात्री जे काही होतंय ते शूट करावं. एकदा पुरावा मिळाला कि पोलिसांकडे जाता येईल. आणि मग पोलिस पुढचं सगळं बघून घेतील. मात्र विक्रम आणि मेघाने ह्याला विरोध केला. त्यांना माहित होतं सुमेधची अवस्था मागच्या वेळी काय झाली होती.

इतक्यात सुमेधला आठवलं, बंगल्याच्या आतलं सगळं फोटोमध्ये होतं तसंच रिअलमध्ये होतं. म्हणजे कुणीतरी त्याची चांगली देखभाल करत होतं. पण कोण..? त्यांनी ब्रोकरला बंगल्याच्या केअरटेकरबद्दल विचारलं. तर त्याने तो गावाच्या बाहेरच्या बाजूला राहत असल्याचं सांगून त्याचा पत्ता दिला. आणि मग सुमेध आणि विक्रम त्या केअरटेकरकडे गेले...

ते दोघं त्याच्या घरी गेले तेव्हा तो घोरत पडलेला. घर कसलं, पडकी झोपड़ी होती ती. फाटका बनियन, मळलेलं धोतर असा काहीसा त्याचा अवतार होता. त्याच्या शेजारीच देशी दारूची रिकामी बाटली पडलेली. आणि अंघोळ तर त्याने मागच्या दिवाळीला शेवटची केली असावी असं वाटत होतं. आणि हा माणूस तो बंगला एकदम स्वच्छ ठेवत होता(!).

सुमेधने त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला उठवलं. "कोन आलंय रे सकाळ सकाळी *य घालायला..?" असं म्हणत तो उठला, उठता उठता त्याने अजून दोन चार शिव्या घातल्या. सुमेध मात्र तो जागा झाला आहे याची खात्री झाल्यावरच थांबला.

तो उठला, किलकिले डोळे करून त्याने दोघांकडे बघितलं. "काय कामय..?", त्याने विचारलं.

"माहिती हवीये थोडी", सुमेध म्हणला.

"मला काय मिळणार?", तो म्हणाला.

त्यावर विक्रमने शंभराच्या तीन नोटा त्याच्यासमोर पकडल्या. त्याने एका झटक्यात त्या काढून घेतल्या. जणू त्याने वेळ लावला असता तर विक्रम त्या परत ठेवणार होता. नोटा घेतल्यावर एक-एक नोट उजेडात पकडून खरी आहे का ते बघत तो म्हणाला "विचारा."

"त्या" बंगल्याचा केअरटेकर आहेस ना तू? त्या बंगल्याबद्दल माहिती हवी होती.

"राहूद्या साहेब, नको तुमचे पैशे", म्हणत त्याने विक्रमला ते पैसे परत दिले.

"का?", विक्रमने विचारलं.

"त्या बंगल्याबद्दल, तो झपाटलेला आहे याशिवाय जास्तीची माहिती तुम्हाला गावात कुणीच देणार नाही..", तो म्हणाला.

"म्हणून तर आम्ही तुमच्याकडे आलो आहोत", सुमेध म्हणाला.

सुमेधने त्याला तो इथे आल्यापासूनचं सगळं सांगितलं.

"हवं तर जास्त पैसे घे पण माहिती सांग" असं विक्रमने म्हणल्याबरोबर त्याचे डोळे चमकले. "किती देताय?" त्याने विचारलं. विक्रमने पाचशेच्या दोन नोटा त्याच्यासमोर धरल्या. त्याने शांतपणे त्या घेतल्या आणि तो ज्या गोधडीवर झोपलेला तिच्या खाली ठेवल्या. आणि सुमेधकडे बोट करून म्हणाला, "पैशासाठी म्हणून नाही, ह्यांना त्रास झालाय म्हणून सांगतोय.."

तुम्ही ज्या म्हातारा म्हातारीला बघितलं, ते मि. अॅन्ड मिसेस मार्टिन. ते मांजरही त्यांचंच. मिसेस मार्टिनचं लाडकं मांजर होतं ते. १९८० ला ते दोघं इथे आले, आणि हा बंगला बांधून त्यात राहू लागले. त्यांचा मुलगा आणि मुलगी इथंच लहानाचे मोठे झाले. आणि नंतर विदेशात रहायला गेले. त्यांचा मुलगा ह्या दोघांनाही चला म्हणत होता, पण त्या दोघांना हा बंगला सोडवत नव्हता. कसा सोडू वाटेल..? जीव ओतून बंगला बांधलेला दोघांनी. मी त्यांच्याकडे आधी माळी म्हणून होतो. नंतर त्यांच्या उतारवयात ते सांगतील ती बाकीची कामंही करायचो. मिसेस मार्टिन तर आईसारखी माया करायच्या. मि. मार्टिन कडक होते फार.

अमेरिकेला गेल्यापासून मुला-मुलीने तोंडसुद्धा दाखवलं नव्हतं. त्यामुळे मि. मार्टिन फारच चिडलेले असायचे. एक दिवशी मात्र त्यांचा मुलगा घरी आला. मिसेस मार्टिन फार खुश होत्या. त्यांनी त्याला आवडतं ते सगळं बनवलेलं. दुस-या दिवशी तो त्यांना आपल्याबरोबर घेऊन जायचा हट्ट करत होता. त्याला ते दोघं त्याच्यासोबत रहायला हवे आहेत, असं तो म्हणत होता. मिसेस मार्टिन त्यामुळे खुश झाल्या. मात्र मि. मार्टिन यांनी आपण हे घर सोडून जाणार नसल्याचं सांगितलं. त्यांचा मुलगा त्यामुळे दुखावला गेला.

मात्र त्याच्या दुःखाचं कारण वेगळंच होतं हे मला रात्री समजलं.

रात्री मी पाणी नेऊन द्यायसाठी म्हणून त्याच्या खोलीकडे चाललेलो, तेवढ्यात त्याच्या बोलण्याचा आवाज एेकू आला म्हणून मी बाहेरच थांबलो. त्यांच्या बोलण्यावरून एकंदर असं समजलं, कि त्याला बिजनेसमध्ये नुकसान झालं होतं, आणि ते भरून काढण्यासाठी हा बंगला विकायचं त्याच्या डोक्यात होतं. मात्र त्याला माहित होतं कि त्याचे वडील त्याला असा बंगला विकू देणार नाहीत. त्यामुळे तो त्यांना सोबत येण्याबद्दल गळ घालत होता. जेणेकरून मागच्या मागे तो बंगला तो विकू शकेल.

त्या रात्री मग माझं काम झालं म्हणून मी घरी आलो. दुस-या दिवशी सकाळी बंगल्यावर गेलो तर समजलं, मि. आणि मिसेस मार्टिन आता या जगात नाहीत. मि. मार्टिन जिन्यावरून पडले आणि त्यांची मान मोडल्यामुळे जागीच गेले. हा धक्का सहन न झाल्यामुळे मिसेस मार्टिनही गेल्या. असं सगळे सांगत होते. "खरं खोटं त्यांनाच माहित", तो आकाशाकडे बघत म्हणाला.

त्यानंतर दुस-याच दिवशी बंगला विकून त्यांचा मुलगा अमेरिकेला गेला. मलापण जाताना थोडेफार पैसे दिले. मात्र बंगल्याचे नवीन मालक दोन आठवडेपण टिकले नाहीत. तुम्हाला जसा त्रास झाला तसाच त्यांनाही झाला होता. आणि तिथून पुढे जे कोणी त्या बंगल्यात रहायला आलं, सगळ्यांना सारखाच अनुभव आला. गावातली लोकं अनुभवामुळे त्या बंगल्याकडे फिरकतही नाहीत. मीपण तिकडे कधी जात नाही.

"मग तू तो बंगला इतका व्यवस्थित कसाकाय ठेवतोस..?", सुमेधने विचारलं.

तुमच्या इतका वेळ लक्षात नाही आलं काय..? मि. आणि मिसेस मार्टिन बंगला सोडून कधी गेलेच नाहीत. ते अजूनही तिथेच राहतात. बंगल्याची देखभालही तेच करतात. त्यांचं मांजरही त्यांच्यासोबत असतंय. त्यांनी तिथे बाकी कुणाला येऊनही दिलं नाही. हा बंगला म्हणजेच त्यांचं आयुष्य आहे. जोपर्यंत हा बंगला आहे, तोपर्यंत ते दोघेही इथे असणार आहेत...

हे ऐकल्यावर जरावेळ बसून मग ते दोघं तिथून निघून गेले. त्या बंगल्यासमोरून जाताना सुमेधचं लक्ष वरच्या खोलीच्या खिडकीत गेलं. खिडकीतून आतली एक भिंत दिसत होती. आणि त्या भिंतीवर, मि. अॅन्ड मिसेस मार्टिनचा फोटो लटकलेला होता. आधीसारखाच...

आता करण्यासारखं काहीच राहिलं नव्हतं. सुमेधने परत त्या ब्रोकरला फोन लावला. आणि रहाण्यासाठी एखाद्या घराची व्यवस्था करायला सांगितली. एखादं चांगलं घर. जे झपाटलेलं नसावं..!


#हॅष्टॅग.

©Sudesh.

Comments

Popular posts from this blog

Harry Potter Theories: Dumbledore is Death!

ओंडका आणि अजगर...

"ञ-मॅन"