"ञ-मॅन"


"ञ" आणि "त्र".. लहानपनापासूनच जुळे भाऊ. ञ पहिल्यापासूनच बराचसा वाळीत टाकल्यासारखा.. त्र चा मात्र सगळीकडेच लाड होत.. यत्र तत्र सर्वत्र फक्त "त्र"च. ञ ची आठवण मात्र अगदी फारच गरज पडल्यावर होई.(तेही नाईलाजास्तव)..
मात्र ञ ला माहित होतं आपल्यात कायतरी स्पेशल आहे. (कारण त्याने लहानपणी राजहंसाच्या आणि बदकांच्या पिल्लांची गोष्ट चोरून वाचलेली असते)..

तर.. रिकामटेकडा आणि दुर्लक्षित असल्यामुळे मोठा झाल्यावर चुकीच्या संगतीत राहिल्यामुळे 'ञ' ग्रामरनाझींच्या टोळीकडून वापरला जातो. (ग्रामरनाझी म्हणजे व्याकरणाला 'याक्रन' म्हणनारे).

त्र च्या वडिलांच्या मृत्युप'त्रा'त "त्र" असल्यामुळे त्यांची सगळी संपत्ती त्र ला मिळनार हे निश्चित होते.
ही संपत्ती आपल्याला मिळावी यासाठी ग्रामरनाझी एक योजना करतात, लोकांच्या नकळत ते त्र आणि ञ ची अदलाबदली करतात.. एकदम असं नाही, आधी ते ठराविक ठिकाणी त्र च्या जागी ञ ला बसवतात.. लोकांना फरक लक्षात येत नाही म्हणल्यावर ते सगळीकडेच ञ चा वापर सुरू करतात. लहानपणापासून जे मिळत नव्हंत ते आता मिळतंय म्हणून, आणि ग्रामरनाझींची खरी कुटील योजना माहित नसल्यामुळे ञ ला त्यात काही गैर वाटत नाही..

योजनेप्रमाणे सगळी संपत्ती त्रला (म्हणजेच 'ञ'ला) मिळते. त्र चा काटा त्यांनी(ग्रामरनाझींनी) आधीच काढलेला असतो. आणि ञ ला ब्रेक नसलेल्या गाडीत बसवून दिलेले असते.(ही योजना गुप्तपणे ठरलेली असते त्यामुळे तिचा आधी उल्लेख नाहीये).
...........................

ग्रामरनाझी ञ ला ब्रेक नसलेल्या गाडीत बसवतात. आणि गाडीचा अपघात होऊन गाडी खोल दरीत जाऊन पडते. तिथे गाडीचा स्फोट होतो. तो स्फोट पाहून स्वतःवरच खुश होत ग्रामरनाझी घरी जातात आणि ञच्याच पैशांनी दारु पितात.

इकडे "ञ" खोल दरीत पडलेल्या गाडीपासून खूप दूर, खूप जखमी होऊन पडलेला असतो. त्याच्या डोक्याला बराचसा मार लागूनही त्याची "यारदाश" शाबूत असते. ग्रामरनाझींचे कारनामे त्याला पक्के आठवत असतात. ग्रामरनाझींनी आपल्या आयुष्याचं मात्रं केलंय हे त्याला जाणवतं.. आणि मग बदला घेण्यासाठी तो पेटताे..(फक्त पेटतो, पेटून 'उठण्या'इतकी ताकद त्याच्यात सध्यातरी नसते..)
मग आपण काय केलं पाहिजे याचा विचार करत तो तसाच पडून राहतो.

काही तासांनंतर.. पहाटेच्या वेळी एक गृहस्थ ञ पडलेला असतो त्या झाडीकडे येतात.. पडलेल्या ञ ला बघून आपण त्या ठिकाणी काय करायला आलो होतो याचादेखील त्यांना विसर पडतो. हातातल्या डब्ब्यातील पाणी ञच्या तोंडावर मारून ते त्याला शुद्धीवर आणतात, आणि आपल्या घरी घेऊन जातात.
औषध-पाणी झाल्यानंतर ञ आपली स्टोरी त्या गृहस्थाला सांगतो.
.......................
ञ ला वाचवून आपल्या घरी आणनारे गृहस्थ म्हणजे कोणी साधेसुधे नसून फार मोठे व्याकरणपंडित असतात. ग्रामरनाझींचा व्याकरणद्वेषीपणा आणि त्यांनी ञ चा केलेला गैरवापर याची माहिती मिळताच त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. त्या ग्रामरनाझींपेक्षा खरेतर ञ च्या मूर्खपणाचा जास्त राग आलेला असतो.पण तो त्र सारखा दिसतो यात ञची काहीच चूक नाही हे लक्षात आल्यावर ते जरा शांत होतात.
ञ च्या "बदले की आग" चा वापर करून ग्रामरनाझींना धडा शिकवण्याची योजना त्यांच्या डोक्यात असते. पण त्याआधी ञला बरीचशी "शिकवण" देणे आवश्यक असते. शिवाय शारिरिक दृष्ट्या ञ अजूनही कमकुवत असतो.

आपल्या योजनेबद्दल ते ञला सांगतात. एेकताक्षणी तो तयार होतो(नेमकं काय करायचंय हे माहित नसूनपण). ग्रामरनाझींशी लढायचं म्हणजे आपण आधी व्याकरणात पक्के असले पाहिजे. त्यानुसार गुरूजी ञला व्याकरणाचे धडे द्यायला लागतात.(ञ आता त्यांना 'गुरूजी' म्हणत असतो. त्याआधी त्यांना 'गुर्जी' म्हणल्यामुळे ञ ने पहिल्याच दिवशी २७ वेळा शिक्षा भोगलेली असते).

तब्बल तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर गुरूजी आपले 'ब्रम्ह'ज्ञान ञला देऊन त्याला शारीरिक व बौद्धिक दृष्ट्या मजबूत करतात. व्याकरणात ञचा हात धरणारे अखंड देशात कोणी नसते.(अर्थात गुरूजी सोडून).

ग्रामरनाझींविरोधात लढण्यासाठी गुरूजी ञला एक नवी अोळख देतात. ञचा आता "ञ-मॅन" झालेला असतो.
"व्याकरणाला 'याक्रन' म्हणना-यांनो.. सावधान! 'ञ-मॅन' तुम्हाला धडा शिकवायला येत आहे..!" अशी गर्जना करत "ञ-मॅन" आकाशात झेप घेतो...

(समाप्त.)
Photo Courtesy - ज्युनियर ब्रम्हे.

Comments

  1. bhau....awesome...!!! :-D :-D hasun hasun potala 'tra's vyayla laglay

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Harry Potter Theories: Dumbledore is Death!

ओंडका आणि अजगर...