"Vru the Wondergirl.." & the Mystery of Thor...

एकदा वृ असंच फिरत फिरत लंडनला जाती. तिथं सतत कामासाठी वसवसलेला शेरलाॅक होल्मसपन केस शोधत फिरत असतो. सोबतीला इमा वाॅटसनपन असती.
(डाॅ. वाॅटसन सुट्टीवर असल्यामुळं शेरलाॅकनं इमाला एंटर्नशिपसाठी म्हणून बोलवून घेतलेलं असतंय.)
मग वृ पन त्यांना केस शोधायला मदत करू लागते.

असंच हुडकत हुडकत त्यांना एक केसांची बट सापडते. मग ती बट कोणाची असेल याचा विचार शेरलाॅक करु लागतो. इमा शैरलाॅकला विचारते, "आता ही बट कोणाची आहे हे कसं कळणार..?"
"एलिमेंटरी माय डिअर वाॅटसन..", वृ म्हणते.
शेरलाॅक म्हणतो, "हा माझा ड्वायलाग हाय.."
मग वृ म्हणती, तुझा वाॅटसन वेगळाय..
मग शेरलाॅक गप बसतो.

मग सगळे शेरलाॅकच्या घरी जातात. तिथं वृ "रुपांतरण काढा" बनवते. त्यात त्या केसाच्या बटीमधले केस टाकून तो काढा इमाला प्यायला लावते. इमा तो काढा प्यायला का-कू करत असतानाच, अत्यंत येक्सायटेड झालेला शेरलाॅक तो काढा पिऊन टाकतो.

दोनच मिंटात शेरलाॅकच्या जागी "थाॅर" दिसू लागतो.. पण नेहमीप्रमाणे लांब केसांचा नाही.. हेअर कट केलेला.. आणि तरीही अत्यंत हँडसम असा. इमा धावत त्याच्याकडे जायला लागते तितक्यात वृ तिला मागं ओढते.. आणि गबस म्हणते.. कारण तो दिसायला जरी थाॅर असला, तरी तो शेरलाॅकच असतो.

पण आता प्रश्न हा असतो, कि थाॅरची केसं तिथं का पडली होती..? आणि त्यानं कटिंग का केलिये..?
थाॅरच्या केसांमुळे खरीखुरी केस मिळाल्यामुळे शेरलाॅक जाम खुश होतो..

आणि मग ते तिघे मिस्ट्री साॅल्व्ह करायला बेकर स्ट्रीटवरून चालत निघतात..
.........

वृ, शेरलाॅक आणि इमा वाॅटसन "थाॅर"ची मिस्ट्री साॅल्व्ह करायला बेकर स्ट्रीटवरुन चालत निघतात.
ते थोडेच पुढे जातात तेवढ्यात त्यांना स्कूबी-डू आणि गँग भेटते. ते लोकं वृ ला ओळखत असतात. आणि लंडनमध्ये रहायला जागा शोधत असतात. मग वृ त्यांना शेरलाॅकच्या घरचा पत्ता देते. बदल्यात ती त्यांना 'मिस्ट्री मशीन' (त्यांची कार) उधार मागते. शॅगी त्यांना बिनदिक्कत ती देऊन टाकतो.

आणि मग आपली टोळी मिस्ट्री मशीनमध्ये बसून मिस्ट्री साॅल्व्ह करायला निघते. पण पुढच्याच चौकात एका उताराच्या ठिकाणी माॅरियार्टी त्यांच्या गाडीला कट मारतो. त्यामुळे मिस्ट्री मशीन त्या उतारावरून गडगडत खाली जाते. सुदैवाने सगळ्यांना फक्त खरचटतं. मग शेरलाॅक गाडीच्या बाहेर येऊन माॅरियार्टीला शिव्या द्यायला लागतो. माॅरियार्टी त्याला रिटर्न शिव्या देतो. आणि मग दोघं भर चौकात एकमेकाची आयभैन काढत बसत्यात.

इकडे खाली वृ आणि इमा गाडीबाहेर येऊन ह्यांची भांडणं बघत थांबलेल्या असतात. अचानक बाजूला झाडीत कायतरी चमकतं. ते काय आहे बघायला म्हणून वृ तिकडे जाते, आणि पाहते तर तो थाॅरचा हातोडा असतो. वृ तो हातोडा घेऊन गाडीपाशी येते, आणि इमाला विचारते, "काय स्कोरए..?"
"शेरलाॅक ४ शिव्यांनी मागंय..", इमा सांगते.
मग वैतागून वृ तिथे जाते, आणि माॅरियार्टीच्या हनुवटीवर हातोडा मारून त्याला उडवून लावते.
आणि मग माॅरियार्टी, लांब एका बांधकाम चालू असलेल्या पुलाच्या कंस्ट्रक्शन साईटच्या तिथं जाऊन पडतो. तिथेच त्याचा शेवट होतो.

मग वृ तो हातोडा शेरलाॅकच्या हातात देत, "मी गाडी काढते..", असं म्हणते. पण शेरलाॅक तो हातोडा उचलू शकत नाही, त्यामुळे तो हातोडा पाडतो ते पाडतो, वर त्याखाली स्वतःचे हातपन सापडून घेतो. दोन्ही हात फ्रॅक्चर झाल्यामुळं तो त्या दोघींना म्हणतो आता तुम्हीच ही मिस्ट्री साॅल्व्ह करा.
तेवढ्यात इमा आठवण करून देते कि, तिची एंटर्नशिप उद्या संपतीये. मग ती घरी जाणार.

असा सगळा लोचा झाल्यामुळं मग शेवची वृ एकटीच थाॅरची मिस्ट्री साॅल्व्ह करायला निघते...
............

वृ एकटीच थाॅरची मिस्ट्री साॅल्व्ह करायला निघते.
तिच्याकडे थाॅरचा हातोडा असतोच. तो वापरून ती डायरेक्ट 'अॅस्गार्ड'ला जाते.
तिथं ती थाॅरच्या घरी जाते, आणि आत जाऊन बघते तर..

थाॅर आणि लोकी बनियन-शाॅर्ट्स घालून कॅरम खेळत बसलेले असतात. वरती फुल्ल स्पीडमध्ये पंखा चालू असतो. दोघांच्या बाजूला थंडगार पन्ह्याचे ग्लास असतात. आणि विशेष म्हणजे दोघांनी कटिंग केलेली असतीये..
ते दोघे तिला बघून खेळायला बोलावतात.

तेवढ्यात आतून थाॅरची मम्मी बाहेर येती, आणि वृ ला बघून म्हणते, "अगं वृ.. येना.. बस. आज इकडे कशी..?"
"काकू, थाॅरचा हातोडा सापडला होता.. परत द्यायला आलते.." वृ शहाण्या बाळासारखं सांगते.
"हरवला होता..? परत..? ह्या कार्ट्याला तर हातोडा देऊनच चूक केलीये.. कुठं सापडला बाळा तुला..?"
"खाली.. पृथ्वीवर.."
"ए रताळ्या.. खाली कशाला गेलता रे..? परत त्या फ्युरीसोबत खेळायला गेला तर तंगडं तोडीन म्हणलेलं ना..?"

(तिकडे थाॅर तोंड लपवायला जागा शोधत असतोय, लोकी तर अगदी एलओएल झालेला असतोय.. आणि वृ शहाण्या बाळासारखी खाली मुंडी घालून काकूंनी दिलेलं पन्हं पीत असतीये..)

"ए मी नव्हतू गेलू.."
"मग तुझा हातोडा कसा गेला खाली..? मी नेऊन ठेवला..?"
"तसं नाय मम्मे.. काय झालं, मगाशी मी अन् लोकी हातोड्याचा कॅचकॅच खेळत हुतो. मी जरा जोरात फेकला हातोडा, आणि लोकीनं पकडलाच नाही. मग तो जाऊन पडला पृथ्वीवर.."
"मग परत का नाही आणला..?"
"बाहेर ऊन कितीये बघितलं का..? मी आपलं म्हणलं संध्याकाळी निवांत आणावा.. तेवढ्यात ही टपकली हातोडा घिऊन.."

("अच्छा.. म्हणून तो हातोडा तिथं पडलेला".. वृ मनातल्या मनात म्हणते.)

"गबस.. उगीच त्या वृ ला काय म्हनू नको.. बर बसा आता खेळत.. मी जाते..", थाॅरची मम्मी म्हणते.
"काकू.. एक विचारू..?", वृ म्हणते.
"बोल ना बाळा.."
"थाॅरनं आणि लोकीनं कटिंग का केलीये..?"
तिनं तसं विचारल्यावर थाॅरची मम्मी त्या दोघांकडं बघून हसत म्हणते, "सांगू का..?"
त्यावर दोघंपन केविलवाणं तोंड करून "नक्को.." म्हणतात.

"अगं, उन्हाळा चालू झालाय ना.. मग उकडू नये म्हणून केलिये कटिंग दोघांची.." थाॅरची मम्मी सांगते आणि निघून जाते..
तिकडे थाॅर आणि लोकी रागाने वृ कडे बघत असतात.. आणि वृ मात्र नुस्ती हसत असतीये..😂😂

(संपलं..😃)

#Vru_The_Wondergirl..
#हॅष्टॅग.

Comments

Popular posts from this blog

Harry Potter Theories: Dumbledore is Death!

Harry Potter Fan Theories

ओंडका आणि अजगर...